top of page

पाठीच्या मणक्याचे आजार व आयुर्वेदिक उपचार

  • Writer: AyuPedia Group
    AyuPedia Group
  • Jul 10
  • 2 min read

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये स्वतःकडे वळून पाहण्यासाठी ही आपल्याला वेळ मिळत नाही शिक्षण, नोकरी, व्यवसाय, पैसे मिळवण्यासाठी आणि आपले आयुष्य सर्व बाजूंनी सुखसंपन्न कसे होईल यासाठी सर्व चैनीच्या वस्तूंच्या मागे धावणे, त्यासाठी प्रचंड मानसिक ताणतणाव सहन करणे शारीरिक क्षमतेपेक्षा अधिक काम करणे. चुकीच्या पद्धतीने बनवलेले व आरोग्याला हानीकारक असे अन्न सतत सेवन करणे, कामाचे बदललेले स्वरूप यामुळे शरीराची अकाली झीज होते व वार्धक्यजन्य तक्रारी मध्यवयापासूनच त्रास देऊ लागतात त्यामध्ये सर्वाधिक तक्रारी या मणक्याच्या आजारांच्या दिसून येऊ लागल्या आहेत. बदललेल्या जीवनशैलीमुळे या सांध्यांना पोषक अंश न मिळाल्यामुळे त्याची झीज होते पर्यायाने त्यांच्यामध्ये विकृती येऊ लागते.

प्रामुख्याने यामध्ये मानदुखी, कंबरदुखी, स्लीप डिस्क, सायटिका, कॉर्ड कंप्रेशन, स्पॉन्डिलायटिस अशा व्याधींचा प्रादुर्भाव होतो. यामध्ये मानेमध्ये कंबरेमध्ये प्रचंड वेदना हातापायांमध्ये मुंग्या येणे, हालचालींना मर्यादा येणे, अधिक काळापर्यंत काम करता न येणे अशी काही महत्वाची लक्षणे दिसून येतात.

मणक्यांचे आजार होण्यामागे अनेक कारणे आढळून येतात. त्यात प्रामुख्याने व्यवसायजन्य बाबी म्हणजेच डोक्यावर, खांद्यावर किंवा पाठीवर जड वस्तू उचलणे, अपघातामुळे मणक्याला इजा होणे, सतत बैठ्या स्वरूपाचे काम करणे, संकरीत धान्य व फवारलेले धान्य तसेच पालेभाज्या यामुळे हाडांना येणारी ठिसूळता सतत वेदनाशामक औषधांचे सेवन करणे खड्डे असलेल्या रस्त्यांवरून सतत प्रवास करणे. स्त्रियांमध्ये विशेषतः सुतिका अवस्थेत योग्य परिचर्येचे पालन न करणे त्याचप्रमाणे रजोनिवृत्तीनंतर हाडांना ठिसूळता येणे इत्यादी.

पूर्वीच्या काळी ज्यावेळी चुलीवर अन्न शिजवले जात असे त्यावेळी स्वयंपाक करताना नकळतच स्त्रियांच्या मणक्यांना व सांध्यांना शेक मिळत असे व त्यामुळे त्यांना वातव्याधींना धोका अतिशय कमी व उतारवयात येत असे परंतु हल्लीच्या बदललेल्या जीवनशैलीमध्ये पाश्चात्य पद्धतीचे अंधानुकरण झाल्यामुळे ती पद्धत लोप पावली व वाताच्या व मणक्यांच्या तक्रारी स्त्रियांमध्ये अधिक वाढू लागल्या मणक्यांच्या आजारांची उत्पत्ती होण्यामध्ये शरीरातील वात दोष मुख्य भूमिकेत असतो त्यामुळे जेवणामध्ये वातूळ पदार्थ अधिक घेणे उदा. वांगे, बटाटे, हरभरा डाळ, वाटाणे, तळलेले, अति तिखट, रुक्ष पदार्थ शरीरात वात दोष वाढवून दोन मणक्यांमधील वंगणासारखा स्निग्ध पदार्थ कमी करून मणक्यांचे आजार उद्भवण्याकरिता सहाय्यभूत ठरतात. यामुळे आयुर्वेदिक उपचार पद्धतीमध्ये ह्या आजारांच्या उत्पत्तीमागचे मुख्य कारण शोधून त्याप्रमाणे उपचारांची दिशा ठरवली जाते सुरुवातीस बरेच दिवस वेदनाशामक औषधी घेऊन रुग्ण उपचारांर्थ येतात परंतु वेदनाशामक औषधींनी तात्पुरते बरे वाटते. ह्या औषधी सुरू असेपर्यंतच रुग्णाला उपशाम वाटतो परंतु ही मणक्यांच्या आजाराची परिपूर्ण चिकित्सा नाही त्यासाठी आयुर्वेदिक उपचार अतिशय उपयुक्त ठरतात. सोबत पंचकर्म चिकित्सेची जोड दिल्यास त्यांचा पुनर्भव देखील टळू शकतो.

या विकारांमध्ये वात दोष प्रमुख असतो जो इतर दोन म्हणजेच कफ व पित्ताला कार्य करण्यास प्रवृत्त करत असतो व तोच सर्व शरिराचे व मनाचे नियंत्रण करत असतो.

"वायुस्तंत्रयंत्र धर ....!" (चरक संहिता)

यामुळे ह्या वातावर नियंत्रण मिळवण्याकरता पंचकर्मातील बस्ति चिकित्सेचा अतिशय लाभ या विकारांमध्ये होतो सर्वांग स्नेहन म्हणजे संपूर्ण शरीराला तेल लावणे, स्वेदन म्हणजेच वाफ घेणे, यामुळे रूक्षता कमी होऊन सिरांचा संकोच दूर होण्यास मदत होते स्नायूंना आलेला कठीणपणा नष्ट होऊन ते लवचिक होतात त्याचबरोबर कटीबस्ती, मन्याबस्ती, नस्य याही उपचारांमुळे कमी वेळेत उत्तम उपशय मिळतो बस्ती मुळे हाडांची झीज भरून येण्यास मदत होते व सांध्यांमधील स्नेह तयार होण्यास मदत होते यासर्व उपचारांबरोबरच वेळेत जेवण, आपल्या प्रकृतीला मानवेल असा योग्य आहार विहार, माफक व्यायाम, आणि मनस्वास्थ्य टिकून राहील असे आचरण यामुळे मणक्यांच्या आजारांमध्ये सुधारणा येण्यास सहाय्य होते. प्राणायाम, योगासनांचा समावेश आपल्या दिनचर्येत करावा. या सर्व उपचारांसाठी आपल्या जवळील योग्य आयुर्वेद तज्ञाचा सल्ला घेऊन चिकित्सा करून घेतल्यास या अत्यंत कष्टदायी आजारांवर आपणास मात करण्यास नक्की यश मिळेल यात शंका नाही.

 
 
 

Comments


bottom of page