top of page

मानसव्याधी आणि आयुर्वेद

  • Writer: AyuPedia Group
    AyuPedia Group
  • Jul 10
  • 2 min read

मानसिक व्याधींविषयी जनमानसामध्ये अनेक प्रकारच्या चुकीच्या समजुती, त्यांच्या हेतुंविषयी, उपचारांविषयी अज्ञान असल्यामुळे मानसव्याधी बळावत चालले आहेत व सध्या इतर शारीरिक व्याधींनी ग्रस्त रुग्णांपेक्षा मनोरुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र दिसू लागले आहे. प्रत्यक्ष चिकित्सा करताना असे लक्षात येते की, शरीर व्याधींपेक्षा मानसव्याधी हे चिकित्सा करण्याच्या दृष्टीने अधिक दुष्कर आणि कष्टसाध्य असतात, कारण ते वाढू लागतील अशा अवस्थेपर्यंत त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येते आणि त्यावर चिकित्सा करून घेण्याची बहुतांश रुग्णांची व त्यांच्या आप्तेष्टांची तयारी नसते. शिवाय मन हे अमूर्त असल्याने मनासारख्या सुक्ष्म भावाची चिकित्सा करणे हे काही अंशी आव्हानात्मक स्वरुपाचे असते.



मानसिक व्याधी आणि शारीरिक व्याधी खऱ्या अर्थाने वेगळे करता येतच नाही, कारण मन हे शरीरातच अधिष्ठित असल्यामुळे ते शरीरामध्ये सर्वार्थाने लीन असते. आचार्य चरकांनी त्वचेसहित संपूर्ण शरीरात मनाचे अस्तित्व सांगितले आहे. आचार्य भेलांनी शिरामध्ये तर इतर संहिता ग्रंथांमध्ये मन हे हृदयामध्ये वास्तव्यास असते असे सांगितले आहे. ज्यामुळे ज्या ज्या घटकांनी शरीर उपतप्त होतं त्याचा परिणाम म्हणून मनावरही त्याचा परिणाम होत असतो. यासंदर्भात सांगतांना माऊली असा दृष्टांत देतात-

जैसे भांडियाचेनि तापें आंतुले उदकहि तापे| तैसी धातुवशे आटोपे चित्तवृत्ती || (श्री ज्ञानेश्वरी अ.१७)

म्हणजेच ज्याप्रमाणे भांडे तापले असता त्या भांड्यातील पाणीही ऊन होते, त्याचप्रमाणे शरीरातील धातू जसे (सात्विक, राजस, तामस) असतील त्याप्रमाणे चित्ताच्या वृत्तीही बनतात.

म्हणून ज्याप्रकारचे अन्न सेवन केले जाते, त्याप्रकारच्या मनोगुणांची वृद्धी होत असते. म्हणजेच सात्विक आहाराने मनाचा सत्वगुण वाढततो व राजस, तामस आहाराने रज व तम या मनोगुणांची म्हणजेच दोषांची वृद्धी पर्यायाने होत असते.

तेवी जैसा घेपे आहारु | धातु तैसाचि होय आकारु || आणि धातु ऐसा अंतरु | भावो पोखे ||

म्हणजेच जसा आहार घेतला जाईल तसे रसरक्तादि धातु व शरीर बनते व धातुप्रमाणे अंतःकरणातील भाव उत्पन्न होतात.

मनुष्य जे अन्न खातो त्याचे जठराग्निच्या योगाने स्थूल, मध्यम व सुक्ष्म असे तीन भाग होतात. स्थूल भाग मलरूप होतो. मध्यमभाग रसरक्तादि धातुरूप होतो व सुक्ष्मभाग हा मनरुप होतो म्हणून अन्न व मन यांचा इतका जवळचा संबंध आहे हे यावरून सिद्ध होते म्हणूनच मानसिक रोगांच्या चिकित्सेमध्ये इतर औषधी चिकित्सेच्या सोबतच पथ्यापथ्य व आहारयोजनेला अधिक महत्व आहे.

पर्युषित, क्लिन्न, आंबवलेले, जड पदार्थ, अति खारट, तिखट आणि आंबट पदार्थ म्हणजेच थोडक्यात हल्लीचे जंक फूड हे राजसिक व तामसिक स्वरुपाचे असते आणि ते अनेक मानसिक व्याधी म्हणजेच उदा. अवसाद, क्रोध, भय, चिंता, उद्वेग, विषाद दैन्य, अभ्यसूया इ. व्याधींना आमंत्रक ठरते तसेच पूर्वीच शरीरात असलेल्या व्याधींची वृद्धी करते.

यासोबतच हल्ली वाढलेला कामाचा तणाव, लॅपटॉप, मोबाईलचा होणारा अतिवापर यामुळे देखील मानसिक व्याधींचे प्रमाण वाढत चालले आहे. लॅपटॉप, मोबाईलच्या स्क्रीनवरील प्रखर प्रकाशाने शरीरातील तेजाचीच पर्यायाने पित्ताची विकृती येऊ लागते व ते विकृत पित्त रसधातू बिघडवते आणि रसधातूची उत्पत्ती हृदयातून होत असल्याने तेथे स्थित मनाचीही विकृती व्हायला सुरुवात होते आणि हे विषचक्र खूप काळ सुरू राहिल्यास त्यातून मनोविकार उत्पन्न होतात.

आयुर्वेदाने मनोविकार उत्पन्न न होण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत, त्यामध्ये पथ्यकारक व सात्विक आहार, दिनचर्या अध्यायात सांगितलेलेल्या सद्वृत्तांचे पालनयोग्य प्रमाणात निद्रा इ.चा मुख्यत्वे समावेश आहे.

मनोविकारांची चिकित्सा करण्यासाठी मेंदुला झोपेची औषधे देऊन निद्रिस्त करून ठेवण्यापेक्षा त्याला सजग व जागृत ठेवणे गरजेचे असते जे आयुर्वेदिक चिकित्सेने साध्य होऊ शकते. आयुर्वेदामध्ये शिरोधारा, शिरोबस्ति, नस्य, जलौकावचर अग्निकर्म, दहनकर्म इ. अनेक प्रकारांची योजना करून या व्याधींवर नियंत्रण मिळवता येते. आयुर्वेदाच्या साथीने तसेच योग्य आहार, प्राणायाम यांच्या जोडीने अतिशय दुष्कर वाटणाऱ्या मनोरोगांवर मात करणे शक्य होऊ शकते. त्यामुळे आत्महत्येसारख्या विकृत वाढींना पायबंद बसून एक सशक्त, प्रयोगशील व बळकट समाज बनण्यास नक्कीच सहकार्य होईल.

 
 
 

Comments


bottom of page